
धुळे, 22 सप्टेंबर (हिं.स.) भारत विकास परिषदेतर्फे निकम कॉलेज, गोंदूर रोड, वलवाडी, धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, हरणमाळ, धुळे येथील दोन शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक हेमराज यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, विविध क्रीडा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त व संघभावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ‘जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच शाळेच्या गणित विभागातील दीक्षा भट यांना अध्यापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही शिक्षकांनी आपल्या कार्यातून शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेत मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान संपूर्ण छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांना आणखी उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हेमराज भामरे आणि मिस. दीक्षा भट यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही त्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य व समर्पित कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देत राहावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, हरणमाळ परिवारासाठी हा सन्मान निश्चितच गौरवास्पद असून, शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची आणि समर्पणाची ही यथोचित पोचपावती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर