
चंद्रपूर, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचा ‘राज्य महोत्सव’ असलेल्या गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महागणेशोत्सव’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुरुवार, दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक कलावंत व सांस्कृतिक पथकांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच गायन, वादन, नृत्य व नाट्यकलेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
गणेशोत्सवावर आधारित विविध कलांचे सादरीकरण-
‘महागणेशोत्सव’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत गायन, वादन, नृत्य तसेच लघुनाट्य-संगीतिका या प्रकारांत सादरीकरण करता येणार आहे. सादरीकरण गणेशोत्सवावर आधारित, भक्तिरसपूर्ण तसेच पारंपरिक व सांस्कृतिक मूल्यांना अनुसरून असणे आवश्यक आहे.
ही स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक कलावंत आणि सांस्कृतिक पथकांसाठी खुली असून स्पर्धेसाठी वयोगटाची कोणतीही मर्यादा राहणार नाही. स्पर्धेत वैयक्तिक किंवा सांघिक अशा दोन्ही स्वरूपात सहभाग घेता येईल.
सादरीकरणासाठी निश्चित वेळ-
वैयक्तिक सादरीकरणासाठी 5 ते 7 मिनिटे, तर सांघिक सादरीकरणासाठी 10 ते 12 मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. रंगमंचावरील मांडणीसाठी कमाल दोन मिनिटांचा वेळ दिला जाणार असून सर्व स्पर्धकांनी निर्धारित वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील.
कार्यक्रमादरम्यान एलईडी बॅकड्रॉपवर दाखविण्यासाठी आवश्यक असलेले ऑडिओ अथवा व्हिडिओ ट्रॅक संबंधित स्पर्धकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान दोन तास अगोदर पेनड्राइव्हद्वारे संयोजकांकडे सादर करणे आवश्यक आहे.
सादरीकरणासाठी आवश्यक वाद्ये, वेशभूषा व रंगभूषेची व्यवस्था संबंधित कलाकार किंवा पथकाने स्वतः करावयाची आहे. आयोजकांकडून ध्वनीव्यवस्था, माईक आणि प्रकाशयोजना उपलब्ध करून देण्यात येईल.
सांस्कृतिक मूल्यांचे पालन आवश्यक-
सादरीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारची असभ्य किंवा अश्लील गाणी, संवाद अथवा हावभाव तसेच सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या बाबींचा समावेश करण्यास सक्त मनाई राहील. प्रत्येक कलाकार व पथकाने आपले सादरीकरण विहित वेळेत आणि सांस्कृतिक मूल्यांचे पालन करून पूर्ण करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन्मानिका/सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच गुणवंत कलावंतांना मुख्य रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी व्हॉट्सॲपवर माहिती पाठवावी-
या सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकार व सांस्कृतिक पथकांनी आपले नाव, संघाचे/पथकाचे नाव, सादर करण्यात येणाऱ्या कलाकृतीचे नाव किंवा स्वरूप आणि संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप संदेशाद्वारे नोंदवावा.
नोंदणी व अधिक माहितीसाठी शुभम दांडेकर, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना – 7709796449 किंवा गीता उत्तरवार, नायब तहसीलदार, रोजगार हमी योजना – 9421725513 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था व पथकांनी या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उत्सवात आपले कलागुण सादर करावेत. तसेच हा कार्यक्रम पूर्णपणे नागरिकांसाठी मोफत असून जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव