दुष्काळामुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ; आर्थिक मदत देण्याची मागणी
परभणी, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले असून लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांची भेट
Q


परभणी, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले असून लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

बालगंधर्व सांस्कृतिक मंडळ, राजीव गांधी युवा फोरम आणि गोंधळ महर्षी राजारामबापू कदम सेवाभावी संस्थेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी लोककलावंतांच्या वतीने रामराव वडकुते यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा फटका बसला असून कार्यक्रम बंद असल्यामुळे लोककलावंतांच्या उत्पन्नाचे साधनही ठप्प झाले आहे. त्यामुळे शासनाने कलावंतांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच कलावंत मानधन योजनेच्या निवड याद्या मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असून त्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. केंद्र शासनाच्या कलावंत पेन्शन योजनेतील मानधनात इतर राज्यांच्या धर्तीवर वाढ करावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी नाट्यनिर्माते संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, रामदास कदम, प्रकाश बारबींड, शिवाजीराव सुक्ते, बालाजी वाडेकर, दत्तराव वाडेकर यांच्यासह विविध लोककलावंत उपस्थित होते. वासुदेवाच्या पारंपरिक पोशाखात लोककलावंतांच्या वतीने रामराव वडकुते यांना निवेदन सादर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande