
रायगड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळी हंगाम संपल्यानंतर दरवर्षी करण्यात येणाऱ्या नियमित देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक सुरक्षा तपासणीच्या कामांसाठी रायगड किल्ला रोपवे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. नियोजित कामे वेळेत पूर्ण झाल्यास येत्या १६ नोव्हेंबर २०२६ पासून ही सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.
किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवे ही पर्यटक आणि दुर्गप्रेमींसाठी अत्यंत सोयीची आणि वेळेची बचत करणारी सुविधा मानली जाते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि शारीरिक व्याधींमुळे पायी चढाई करणे अशक्य असणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा मोठा आधार ठरते. मात्र, सद्यस्थितीत ही सेवा बंद असल्याने या काळात गडावर येणाऱ्या सर्वच पर्यटकांना पारंपरिक पायी मार्गाचाच (पायऱ्यांचा) वापर करावा लागणार आहे. यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांची, विशेषतः वयोवृद्ध भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यानंतर सर्व यंत्रणांची कसून तपासणी केली जाते. याच अनुषंगाने यंदाही रोपवेच्या मुख्य केबल्स, ट्रॅव्हलिंग ट्रॉलीज, विद्युत व यांत्रिक मोटर्स आणि सुरक्षा ब्रेक यंत्रणेचे सखोल ऑडिट केले जात आहे. सर्व तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या तांत्रिक कामांमुळे शिवभक्तांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रायगड रोपवे प्रशासनाचे राजेंद्र खातू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे काम अत्यावश्यक असल्याने शिवभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)