
रत्नागिरी, 22 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवानिमित्ताने कोकणातील गावागावांत पुन्हा चैतन्य निर्माण झाले असून, मुंबई-पुण्यासह विविध शहरांत राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावा दाखल झाल्याने वाड्या-वस्त्या, बाजारपेठा आणि घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून गावोगावी पूजा, सत्यनारायण, भजन, फुगड्या तसेच विविध पारंपरिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. मर्यादित सुटी असतानाही ‘बाप्पासाठी चार दिवस तरी गावाकडे यायचेच’ या भावनेने चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे बाजारपेठांमध्येही मोठी खरेदी झाली.
गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणात भजन मंडळांच्या कार्यक्रमांना विशेष प्रतिसाद मिळत आहे. भक्तिगीते, भावगीते, अभंग, भजने आणि गजरांनी कोकणातील वाड्या-वस्त्यांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आबालवृद्धांसह नव्या पिढीचाही भजनाच्या कार्यक्रमांकडे वाढता ओढा दिसून आला.
मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या युगातही भजन, अभंग आणि पारंपरिक लोककलेला मिळणारा प्रतिसाद कोकणच्या सांस्कृतिक परंपरेसाठी आश्वासक ठरत आहे. बदलत्या काळानुसार या परंपरांना नवी रूपे मिळत असली, तरी मातीशी जोडलेली भावना, भक्ती आणि आपुलकी आजही कायम असल्याचे गणेशोत्सवातून दिसून येत आहे. आता गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. राहिलेल्या चार दिवसांमध्येही स्थानिक लोककलांना बहर येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी