घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटावरून अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत चर्चा
निविदा प्रक्रियेवर नागरिकांचे लक्ष; मुख्याधिकाऱ्यांकडून पारदर्शकतेची ग्वाही अमरावती, २२ सप्टेंबर (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटावरून पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान कंत्राटाचा कालावधी संपल्यान
घनकचरा कंत्राटावरून अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत चर्चेला उधाण


निविदा प्रक्रियेवर नागरिकांचे लक्ष; मुख्याधिकाऱ्यांकडून पारदर्शकतेची ग्वाही

अमरावती, २२ सप्टेंबर (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटावरून पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान कंत्राटाचा कालावधी संपल्यानंतर नवीन कंत्राटासाठी नगरपरिषदेने निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, हे कंत्राट मिळविण्यासाठी काही लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून कथित हालचाली सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेवक स्वतःचे नाव पुढे न करता नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या मर्जीतील व्यक्तींच्या नावावर कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची कुजबुज नगरपरिषद वर्तुळात आहे. तथापि, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

घनकचरा व्यवस्थापनाचा थेट संबंध शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याशी असल्याने या कामाची निविदा प्रक्रिया नियमबद्ध, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कंत्राट नेमके कोणाला मिळते, तसेच निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या नावावर कंत्राट देण्यात येणार नसून, एखाद्या लोकप्रतिनिधीने कंत्राट घेतल्याचे आढळल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे आता निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात कोणत्या संस्थेला किंवा कंत्राटदाराला घनकचरा व्यवस्थापनाचे काम मिळते, याकडे अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande