परभणीत २७ सप्टेंबरला ‘जल्लोष लोककलेचा’महोत्सवाचे आयोजन
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने आणि बालरंगभूमी परिषद परभणी जिल्हा शाखेच्यावतीने रविवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता मानवत रोडवरील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाला बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा तथा चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची विशेष उपस्थिती राहणार असून, आमदार सईद खान हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके आणि गटशिक्षणाधिकारी सुनील सत्यनारायण तोष्णीवाल यांची उपस्थिती राहणार आहे. बालकलावंतांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच लोककलेची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात 6 ते 15 वर्षे वयोगटातील बालकलावंतांसाठी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक वादन आणि वैयक्तिक गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने बालकलावंत या महोत्सवात सहभागी होणार असल्याने मानवत येथे लोककलेचा रंगतदार मेळा रंगणार आहे. बालकलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद परभणी जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande