
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। विविध संत आणि प्रबोधनकारांच्या विचारांतून समाजाची जडणघडण झाली असून शाहू, फुले, आंबेडकरांनी स्वयंप्रकाशित सत्याचा विचार समाजासमोर मांडला. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी पूर्ण ताकदीनिशी सत्य स्पष्टपणे सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि वक्ते ज्ञानेश महाराव यांनी केले.
स्मृतीशेष इंजी. एस.एस. नांदापुरकर राज्यस्तरीय पुरस्कार परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना प्रदान करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित प्रभावती विद्यालयाच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराव यांचे विशेष व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजी. भीमराव हाटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून हेमंतराव जामकर, संयोजक गोविंद नांदापुरकर, बाळासाहेब नांदापुरकर आदी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात ज्ञानेश महाराव यांनी भारतीय संविधान, सामाजिक प्रबोधन, छत्रपती शिवरायांचे विचार तसेच समकालीन सामाजिक, राजकीय आणि संविधानिक परिस्थितीवर भाष्य केले. पत्रकारितेची अवस्था सुरुवातीपासूनच बिकट राहिली आहे. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित पत्रकारितेपूर्वी ङ्गव्होकल जर्नालिझमम अस्तित्वात होते. छत्रपती शिवरायांच्या दरबारापासून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपर्यंत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही शाहिरांना मानाचे स्थान होते. मावळे तलवारीने, तर शाहिर आपल्या कवने आणि पोवाड्यांतून लढत होते. ते सत्याला सामोरे जाणारे पत्रकारच होते, असे महाराव यांनी सांगितले.
पेशवाईनंतर शाहिरी नाचगाण्यापुरती मर्यादित झाली. छत्रपती शिवरायांवर दीर्घकाळ पोवाडे लिहिले गेले नाहीत; महात्मा फुले यांनी त्यावर पहिला पोवाडा लिहिला, असे सांगत त्यांनी समाजप्रबोधनातील शाहिरीचे महत्त्व स्पष्ट केले. विज्ञानाचा योग्य वापर करण्याची गरज व्यक्त करताना कॉम्प्युटरचा वापर जन्मकुंडलीसाठी केला जात असेल, तर तो विज्ञानाचा गैरवापर आहे. सत्य सांगण्याची क्षमता नसेल, तर भविष्य सांगण्याचा अधिकारही नाही, असे ते म्हणाले.
भूतकाळातील चुका सुधारून वर्तमानातील वास्तव सांगणे आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सत्य मांडण्याची हिंमत पत्रकारामध्ये असली पाहिजे. सत्य दडवता किंवा लपवता येते; मात्र सत्य संपवता येत नाही. पत्रकारितेत विचारांची बैठक, लेखणीचा कस आणि पत्रकारितेचे धोरण असणे आवश्यक आहे. लेखन आणि वक्तव्यातून पत्रकारांचे विचार दिसले पाहिजेत. केवळ महापुरुषांच्या नावांचा गजर किती दिवस करायचा, असा सवालही महाराव यांनी उपस्थित केला. मुलांना कोणतीही एक कला शिकवा आणि पालक म्हणून जबाबदारी पार पाडा. समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात इंजी. भीमराव हाटकर यांनी आजचा सामाजिक परिप्रेक्ष्य अंधकारमय होत असल्याने चांगल्या विचारांचे चिंतन, मंथन आणि चिकित्सा होण्याची गरज व्यक्त केली. याच भूमिकेतून ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गेल्या 30 ते 40 वर्षांत त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागे करण्याचे काम केले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी चिंतन, चर्चा आणि चिकित्सा आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis