
कोल्हापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहराच्या विकासात आणि प्रशासकीय कामकाजात सामाजिक संस्थांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदा आणि ‘बरंच काही फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर महानगरपालिकेला सुमारे १२ लाख रुपये किमतीचे साहित्य सीएसआरच्या (CSR) माध्यमातून सुपूर्द करण्यात आले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे हा लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.
बँक ऑफ बडोदाचे रिजनल हेड प्रकाश जाधव व बरंच काही फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप संकपाळ यांनी हे साहित्य मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे हस्तांतरित केले. या सीएसआर उपक्रमांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांचे कार्यालयीन कामकाज गतिमान आणि डिजिटल करण्यासाठी २० संगणक संच, शहरात माहिती व जनजागृतीसाठी ५ भव्य एलईडी स्क्रीन तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर दर्जेदार व पर्यावरणपूरक प्रकाश व्यवस्थेसाठी १३७ एलईडी पथदिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या साहित्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाला मोठा हातभार लागणार आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि सामाजिक संस्थांनी सीएसआरच्या माध्यमातून पुढे येऊन कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी केले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर,सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह राजपूत, विद्युत अभियंता नारायण पुजारी, बँक ऑफ बडोदाचे ब्रँच हेड नीरज पांडे तसेच बरंच काही फौंडेशनच्या अश्विनी संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar