
रत्नागिरी, 22 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव मोटारीने मजुराला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ जवळ ही घटना घडली. गोपाल मुर्मू (वय ४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे मृत मजुराचे नाव आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमू लांजा उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी महिंद्रा कार क्रमांक केए ०३ एसी ३६०० घेऊन मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर, सध्या रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जात होता. त्याने मुर्मू यांना जोरदार धडक दिली.धडकेनंतर गोपाल मुर्मू गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक मौला कासम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी