अमरावतीतील सिंधी समाजाला ७७ वर्षांनंतर कायम निवासी पट्टे
अमरावती, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। देशाच्या फाळणीनंतर १९४७ मध्ये सिंध प्रांत पाकिस्तानात गेल्याने आपली जन्मभूमी, घरदार, जमीन-जुमला, शेती-व्यवसाय आणि नातेवाईक सोडून भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजातील ५८५ कुटुंबांना तब्बल ७७ वर्षांनंतर कायमस्वरूप
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ५८५ कुटुंबप्रमुखांना पट्टेवाटप;


अमरावती, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। देशाच्या फाळणीनंतर १९४७ मध्ये सिंध प्रांत पाकिस्तानात गेल्याने आपली जन्मभूमी, घरदार, जमीन-जुमला, शेती-व्यवसाय आणि नातेवाईक सोडून भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजातील ५८५ कुटुंबांना तब्बल ७७ वर्षांनंतर कायमस्वरूपी निवासी पट्टे मिळाले. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आला असून, अमरावतीतील सिंधी समाजाच्या दीर्घ संघर्षाला अखेर न्याय मिळाला आहे.

अमरावती शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या सिंधी समाजातील कुटुंबांना निवासी जागेचा कायमस्वरूपी हक्क मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महसूल विभागाच्या माध्यमातून या प्रश्नावर कार्यवाही करून ५८५ कुटुंबप्रमुखांना निवासी प्रयोजनासाठी कायमस्वरूपी पट्टे देण्यात आले. सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सिंधी समाजाने देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक आणि व्यापारी विकासातही या समाजाचा मोठा वाटा आहे. कापड उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, व्यापार आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून सिंधी समाजाने अमरावतीच्या विकासाला गती दिली आहे.फाळणीच्या काळात सर्वस्वाचा त्याग करून भारतात आलेल्या सिंधी बांधवांनी प्रतिकूल परिस्थितीत नव्याने आपले जीवन उभे केले. संघर्ष, मेहनत आणि उद्योजकतेच्या जोरावर त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या घराचा आणि निवासाचा कायमस्वरूपी हक्क निश्चित होणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, त्यांच्या अनेक दशकांच्या संघर्षाला मिळालेली मान्यता आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.“सिंधी समाजाला हक्काचे घर मिळावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. महसूलमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम माझ्या हातून होत आहे, याचा मला आनंद आहे,” असे बावनकुळे म्हणाले.या निर्णयामुळे ५८५ कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाबाबत अधिकृत आणि कायमस्वरूपी हक्क प्राप्त झाला आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाची शासनाच्या माध्यमातून सकारात्मक सोडवणूक झाल्याने सिंधी समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाला श्री. साई डॉ. संतोष नावलानी महाराज (शिवधारा आश्रम, अमरावती), महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, जयंत डेहनकर, किरण पातूरकर, रविराज देशमुख, मनपा सभागृह नेते चेतन गावंडे, भाजप व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, कन्हैयालाल रंगवानी, डॉ. इंदरलाल गेमनानी, वासुदेव क्रिशवानी, सुनील खराटे, नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे, नगरसेवक डॉ. संजय तिरथकर, रवींद्र खांडेकर, बढते कदम ग्रुपचे सदस्य तसेच सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande