जळगाव - एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग
जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) भुसावळ एमआयडीसी परिसरातील एन.आर.जे. फार्मा या केमिकल कंपनीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. केमिकलमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत शेजारील ट्रान्सफार्मर कंपनीलाही आपल्या कवेत घेतले. या भीषण आगीत द
जळगाव - एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग


जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) भुसावळ एमआयडीसी परिसरातील एन.आर.जे. फार्मा या केमिकल कंपनीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. केमिकलमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत शेजारील ट्रान्सफार्मर कंपनीलाही आपल्या कवेत घेतले. या भीषण आगीत दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यरात्री एन.आर.जे. फार्मा कंपनीत अचानक आगीचा भडका उडाला. कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकल असल्याने आगीच्या तीव्र ज्वाळा पसरल्या आणि बाजूच्या ट्रान्सफार्मर कंपनीलाही आगीने वेढले. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भुसावळ, जळगाव, वरणगाव, दीपनगर तसेच वरणगाव फॅक्टरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पाणी आणि फोमचा मारा केला. तासगणिक चाललेल्या या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या भीषण आगीत दोन्ही कंपन्यांमधील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि इमारत जळून खाक झाली असून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे वृत्त समजू शकले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande