
रत्नागिरी, 22 सप्टेंबर (हिं.स.) । अखिल भारतीय पातळीवर राबवली जाणारी ‘मेडिएशन फॉर नेशन ३.०’ ही विशेष मोहीम १ ऑक्टोबर २०२६ पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरू होत आहे.
या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यायालयातील प्रलंबित दावे, वाद तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले मध्यस्थीद्वारे तडजोडीने निकाली काढले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी दिली.
यापूर्वी मेडिएशन फॉर नेशनचे पहिले अभियान १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राबवले गेले होते. त्यामध्ये मध्यस्थीसाठी पाठवलेल्या एकूण १,८३४ प्रकरणांपैकी ९१ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. त्यानंतर हे अभियान २ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान पार पडले. यामध्ये पाठवलेल्या ८२२ प्रकरणांपैकी ५४ प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली.
मेडिएशन फॉर नेशन ३.० या मोहिमेत एकूण १५ विविध श्रेणींमधील प्रकरणे मध्यस्थीसाठी संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये वैवाहिक वाद आणि कौटुंबिक हिंसाचार, मोटार अपघात नुकसानभरपाई, चेक बाऊन्स (धनादेश अनादर) प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी खटले, ग्राहक तक्रार मंच प्रकरणे, बँक कर्ज वसुली व दरखास्त, लवाद आणि वाणिज्य (कमर्शियल) प्रकरणे, सेवाविषयक वाद (सर्व्हिस मॅटर्स), वाटप, बेदखलपात्र आणि भूसंपादन प्रकरणे, कामगार न्यायालय, विविध न्यायाधिकरणांतील प्रकरणे व इतर दिवाणी दावे यांचे कामकाज होईल.
पक्षकारांनी आपले वाद न्यायालयात प्रदीर्घ काळ न ताणता सामंजस्याने आणि जलद गतीने सोडवण्यासाठी ते मध्यस्थी केंद्राकडे संदर्भित करावेत आणि या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी