पंकजा मुंडेंची यशस्वी मध्यस्थी; माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय स्थगित
बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे माजलगांव (जि.बीड) धरणाची उंची वाढविण्याचा सरकारने घेतलेला निर्णय स्थगित केला आहे, याबाबत फेर सर्वेक्षण करून नंतरच निर्णय घेतला जाईल असे जल
पंकजा मुंडे


बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे माजलगांव (जि.बीड) धरणाची उंची वाढविण्याचा सरकारने घेतलेला निर्णय स्थगित केला आहे, याबाबत फेर सर्वेक्षण करून नंतरच निर्णय घेतला जाईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, हा निर्णय स्थगित केल्याबद्दल युवा शेतकरी संघर्ष समितीने पंकजा मुंडे तसेच विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला होता यामुळे धरण परिसरातील बावीस गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू केले होते, काही दिवसापूर्वी जलसमाधी आंदोलनही त्यांनी केले होते. या आंदोलक शेतकऱ्यांनी माजलगांव मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधून हा सर्व विषय त्यांच्या कानावर घातला. पंकजाताईंनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक बोलवून विस्तृतपणे चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले होते.

पंकजाताईंचा शब्द अन् लगेच बैठक

---------

पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना शब्द दिल्यानंतर लगेचच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात आज दोन्ही मंत्री महोदयांनी संबंधित शेतकरी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत

बैठक घेतली व धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय स्थगित केला. शेतकरी व सिंचन विभागाचे अधिकारी यांच्या वतीने संयुक्त सर्वेक्षण केल्यानंतर अहवालाअंती पुढील निर्णय घेतला जाईल तोपर्यंत माजलगाव धरण उंची वाढीच्या कामाला स्थगिती राहणार आहे. या बैठकीस विखे पाटील, ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह

युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजयसिंह राऊत, जगदीश फरताडे, मोहन जाधव, योगेश कानडे, तसेच बदामराव पंडित, माधव निर्मळ, नितीन नाईकनवरे, रुपाली कचरे,अर्जुन नाईकनवरे, विनायक रत्नपारखी, ईश्वर खुर्पे, शरद कचरे, शुभम महात्मे, गणेशराव शेंडगे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande