
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक
रब्बी हंगामाचे नियोजन करण्याचे निर्देश
कोल्हापूर, २२ सप्टेंबर (हिं.स.)। यंदा अल् निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात २१ सप्टेंबरअखेर ८८२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांची स्थिती, पीक विमा आणि आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली.
विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपसंचालक नामदेव परीट, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. महेश शेजाळ, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मिलिंद किटवाडकर आणि भूजल विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला जिल्ह्यातील धरणनिहाय पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्धतेच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या स्थितीची पाहणी करावी, असे निर्देशही देण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात सुमारे १.५८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून पेरणीची टक्केवारी ८७.३८ इतकी आहे.
कमी पर्जन्यमानामुळे हलक्या जमिनीच्या भागात जमिनीतील ओलावा कमी झाला असून, त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक पीक संरक्षण उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती पांगरे यांनी दिली.
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून पर्जन्यमान, जमिनीतील ओलावा आणि पिकांची सद्यस्थिती यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन तसेच पीक संरक्षण उपाययोजना उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
बैठकीसाठी करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, किरण पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त पी. पी. कुलकर्णी यांच्यासह विविध तालुक्यांतील संबंधित उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar