
रत्नागिरी, 22 सप्टेंबर, (हिं.स.) । गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत चिपळूणमध्ये २४ सप्टेंबरला श्री गणेश कला आणि संस्कृतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या ८ सप्टेंबर २०२६च्या शासन निर्णयान्वये गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याअनुषंगाने सांस्कृतिक समृद्धी आणि लोककलांचा संगम घडवणारा ‘श्री गणेशा... कला आणि संस्कृतीचा’ हा विशेष कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.
या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे उपस्थित राहणार आहेत. शिवाय कोकणातील आमदार-खासदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी