
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। कलियुगात मानवी जन्माचे सार्थक करायचे असेल, तर केवळ स्वतःचा विचार न करता स्वच्छता, वृक्षलागवड, अन्नदान आणि ज्ञानदान या चतुःसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. या सत्कार्यातूनच समाजाची खर्या अर्थाने उभारणी होते, असे प्रतिपादन स्वच्छतादूत तथा आयटीआयचे प्रमुख मार्गदर्शक प.पू. राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी केले.
जिंतूर ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रुग्णांना मोफत भोजनाचे डबे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमापूर्वी साईनाथ महाराज यांनी दत्तभक्तांसह स्वतः हातात झाडू घेऊन वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील गरजू रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते मोफत अन्नधान्य व भोजनाचे डबे वाटप करण्यात आले. यावेळी साईनाथ महाराज यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षलागवड, अन्नदान आणि ज्ञानदान यांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.
दरम्यान, जिंतूर-औंढा रस्त्यावरील पुंगळा एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाही साईनाथ महाराज यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सामाजिक बांधिलकी आणि समाजभान जपावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास जिंतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय मस्के, युवा नेते बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक गणेश कुरे, अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व ज्येष्ठ पत्रकार मंचक देशमुख, सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, भागवत चव्हाण, शेख रहीम यांच्यासह नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis