परभणीत माणुसकीचा आदर्श; अवयवदानातून गरजू रुग्णाला नवसंजीवनी
परभणी, २२ सप्टेंबर (हिं.स.)। परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील सत्यनरेंद्र लाड यांच्या अपघाती निधनाने लाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखाच्या प्रसंगीही कुटुंबीयांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच
Q


परभणी, २२ सप्टेंबर (हिं.स.)। परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील सत्यनरेंद्र लाड यांच्या अपघाती निधनाने लाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखाच्या प्रसंगीही कुटुंबीयांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे गरजू रुग्णाला नवसंजीवनी मिळाली.

सत्यनरेंद्र लाड हे गंगाखेड रस्त्यावरील टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या घटनेने लाड कुटुंबीयांसह माळसोन्ना ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला.

या दुःखद परिस्थितीत कुटुंबीयांनी सत्यनरेंद्र यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. याबाबत तज्ज्ञ डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद डावरे यांच्याशी चर्चा करून आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पार पडली.

परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली.

दुःखाच्या प्रसंगीही लाड कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयातून माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या अवयवदानामुळे गरजू रुग्णाला नवजीवनाची संधी मिळाल्याने डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थितांनी लाड कुटुंबीयांच्या निर्णयाचे कौतुक केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande