
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शेतात राबणार्या, उन्हा-पावसाची तमा न बाळगता धान्याची रास पिकवणार्या राज्यातील महिला शेतकर्यांच्या घामाला आता हक्काची आणि अधिकृत ओळख मिळणार आहे! महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा भव्य शुभारंभ राज्याच्या मा. कृषि मंत्र्यांच्या शुभहस्ते पार पडला.
या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला शेतकर्यांना शासनाच्या कृषी योजना, कर्जे, विमा आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आजवर शेतीतील प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असूनही जमिनीच्या मालकीअभावी त्या शासकीय योजनांपासून वंचित राहत होत्या. मात्र, या उपक्रमात केवळ जमिनीची मालकी हा निकष न ठेवता, शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आले आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन किंवा शेतमजुरी करणार्या प्रत्येक महिलेला ममहिला शेतकरीफ म्हणून मान्यता मिळणार आहे. अगदी भाडेपट्ट्याने वा बटाईने शेती करणार्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर आणि रोपमळा मजुरांनाही या योजनेचा थेट फायदा होणार आहे. राज्यभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पात्र महिला शेतकर्यांची ओळख पटवून त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाईल. येत्या 2 ऑक्टोबरच्या विशेष ग्रामसभेत या प्रमाणपत्रांचे अधिकृत वाटप केले जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याचे तालुका कृषी अधिकार्यांचे आवाहन...
तालुक्यातील सर्व पात्र महिला शेतकर्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://krishi.maharashtra.gov.in) भेट देऊन नोंदणी करावी. तसेच थेट अर्ज करण्यासाठी https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/ खा लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी: ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचण आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिंतूर तालुका कृषि अधिकारी . नितीन घुगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक कष्टकरी महिलेने या योजनेचा लाभ घेऊन आपल्या हक्काचे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis