रत्नागिरी : चिपळुणात रविवारी जागतिक नदी दिनानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रम
रत्नागिरी, 22 सप्टेंबर (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा उपविभाग, चिपळूण तसेच अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्ग मित्र आणि सेवा साधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल साक्षरता’ व ‘चला जाणू या नदीला’ अभियानांतर्गत जागत
रत्नागिरी : चिपळुणात रविवारी जागतिक नदी दिनानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रम


रत्नागिरी, 22 सप्टेंबर (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा उपविभाग, चिपळूण तसेच अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्ग मित्र आणि सेवा साधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल साक्षरता’ व ‘चला जाणू या नदीला’ अभियानांतर्गत जागतिक नदी दिन आणि जागतिक पर्यटन दिन रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात साजरा करण्यात येणार आहे.

नद्यांचे संवर्धन, जलप्रदूषण रोखणे, नदीपात्रातील कचरा व अतिक्रमणाला आळा घालणे तसेच नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यंदाच्या जागतिक नदी दिनाची संकल्पना ‘जंगल नाही, नद्या नाहीत, पाणी नाही, जीवन नाही’ अशी असून जंगल, नदी, जलस्रोत आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने शाश्वत पर्यटन, स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी आणि पर्यटनातील डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेवरही मार्गदर्शन केले जाणार आहे. पर्यटन क्षेत्रातील नव्या संधींचा स्थानिक युवकांनी लाभ घ्यावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी युवा पिढीचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याने चिपळूण शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती, निसर्ग, जंगल, नदी, जलसंधारण आणि पर्यटन या क्षेत्रांमधून स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक युवकांचे शहर व महानगरांकडे होणारे स्थलांतर कमी करून गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही या कार्यक्रमातून विचारमंथन होणार आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे सती महाविद्यालय, डी. बी. जे. महाविद्यालय, गुरुकुल, आनंदराव पवार महाविद्यालय, ए. ई. काळसेकर महाविद्यालय, नॅशनल कॉलेज-मिरजोळी, रिगल कॉलेज-कोंढे, आर. सी. कॉलेज-पेढे-परशुराम, सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालय आणि एस.पी.एम. कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यावेळी निसर्ग, जंगल, नदी, जल, कृषी, पक्षिनिरीक्षण आणि पर्यटन या विषयांवर विद्यार्थ्यांकडून पथनाट्य, नाटिका, प्रहसन, समूहगीत, जनजागृतीपर वक्तृत्व आणि भारूड सादर करण्यात येणार आहे. तसेच चिपळूण व परिसरातील पर्यावरणपूरक पर्यटनाशी संबंधित यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहे.

या उपक्रमात निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक व शैक्षणिक संस्था, युवा मंडळे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी शाहनवाज शाह (९८२२८२०३९५) आणि समीर कोवळे (८८८८०६३३५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande