
मुंबई, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। मुंबई मेट्रो मार्ग ४, ४ अ व १० प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करिता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा ( ता. जि. ठाणे) येथील सर्व्हे क्र. ३० मधील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार या मोघर पाड्यातील प्रकल्पबाधित १९८ शेतकऱ्यांना २२.५ टक्के व १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो रेल प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला. यात वडाळा ते कासारवडवली ठाणे या मेट्रो मार्गिका-४ प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या मार्गिका ४ प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही मार्गिका पुढे गायमुख पर्यंत वाढविण्यात आली आहे.एए
या मेट्रो मार्गिका ४, ४अ व १० व ११ यांच्यासाठी मौजे मोघरपाडा ( ता. जि. ठाणे) येथे एकात्मिक कारशेड डेपो उभारण्यात येत आहे. त्याकरीता येथील सर्व्हे क्र.३० मधील एकूण २११.७६ हे. आर. जमिनीपैकी १७४.०१ हे. आर. जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे. या जमिनीवरील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना २२.५%, व १२.५% विकसित भूखंड वाटप योजनेस तत्कालीन मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या जमिनीवरील प्रकल्प बाधित १६७ शेतकरी व ३१ अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना असे विकसित भूखंड मालकी हक्काने (जमीन धारणाधिकार वर्ग १) वाटप करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर