
मुंबई, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यास व त्यासाठी विकासक नियुक्तीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये परवडणारी घरे निर्माण करण्याकरीता शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळामार्फत मध्यम उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट या गटांकरीता सन १९५० ते सन १९६० च्या दरम्यान ५६ वसाहतीची निर्मिती केलेली होती. ५६ वसाहतींमध्ये ११४ गृहनिर्माण संस्था आहेत. या ११४ सहकारी संस्थामध्ये रामकृष्ण नगर, सी.टी.एस. क्र.८७२ ए/१ व ८७२ ए/२, खार (प) मुंबई यांचा समावेश आहे. त्यातील काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करून रहिवाश्यांचे राहणीमान उंचाविण्यासाठी समूह पुनर्विकास मान्यता देण्यात आली आहे.
रामकृष्ण नगर, खार (प) संस्थेच्या जमिनीचे क्षेत्रफळ २५,५२३.९० चौ.मी. आहे. त्यामध्ये एकूण १९ (१८ इमारती व १ कार्यालयीन इमारत) इमारती आहेत. त्या सन १९८५ च्या दरम्यान बांधण्यात आल्या आहेत. या १९ इमारतींपैकी ३ इमारती असलेले भूखंड क्र. ५, ७ व ८ हे भूखंड म्हाडामार्फत रामकृष्ण नगर सह. गृह. संस्थेस मालकी तत्वावर वितरीत करण्यात आले आहेत. यातील भूखंड क्र, १८ व कार्यालयीन इमारतीच्या ( क्र. १) भूखंडांचे क्षेत्र वगळून उर्वरीत भुखंडावर विकासकाची (सी अँण्ड डी.ए.) नियुक्ती करून म्हाडाच्या माध्यमातून समूह पुनर्विकास करण्यास मान्यता देण्यात आली.
हा प्रकल्प जलद गतीने राबविण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर