अमरावती : सावंगा रस्त्यावरील पूल अचानक खचला
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूररेल्वे येथून मांजरखेड मार्गे सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील पूल अचानक खचला. त्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, परिसरात ना मुसळधार पाऊस झाला, ना भूकंपासारखी नैसर्गिक घ
सावंगा रस्त्यावरील पूल अचानक खचला


अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूररेल्वे येथून मांजरखेड मार्गे सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील पूल अचानक खचला. त्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, परिसरात ना मुसळधार पाऊस झाला, ना भूकंपासारखी नैसर्गिक घटना घडली. तरीही पूल खचल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून होणारी जडवाहतूक आणि पुलाची झालेली दुरवस्था, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, पुलाच्या खचण्याचे नेमके कारण प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

पूल खचल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता पोलिस पाटील हिरासिंग राठोड आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावून हा मार्ग धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले. विशेषतः दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते, असे संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांनी सांगितले. श्री विठोबा संस्थान, सावंगा विठोबा यांच्या वतीने रस्ता व पुलाची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती, असे संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, वेळेत दखल न घेतल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी केला.

त्यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे. भाविक आणि प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून, खचलेल्या पुलाच्या मार्गाने प्रवास न करता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे. पुलाच्या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यासाठी पोलिस पाटील हिरासिंग राठोड, विश्वस्त गोविंद राठोड, लक्ष्मण राठोड, ग्रामस्थ आशिष कुकडकर, गजानन मंगळे, किशोर राठोड, शरद पाटील, कल्पेश मंगळे, दुर्गेश राठोड यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

पूल खचल्यामुळे श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांदूररेल्वे-मांजरखेड मार्गाचा सध्या वापर टाळावा. सावंगा विठोबा येथे येण्यासाठी मालखेड मार्गे, हातला मार्गे अथवा चिरोडी फाट्यावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री विठोबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande