
पुणे, 23 सप्टेंबर (हिं.स.)।
विद्यार्थी जीवनातून व्यावसायिक जीवनात प्रवेश करताना स्वयंशिस्त, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे मत मॉरिशसच्या ला सेंटिनेल उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरिफ सलेरु यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासोबतच चिकित्सक विचारसरणी, समस्या सोडविण्याची क्षमता आणि बौद्धिक विकास याबाबत दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक डॉ. शिवाजी मुंढे, डॉ. सचिन मिसाळ यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु