
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी व धडक कारवाईची मोहीम राबविली. या कारवाईत सुमारे ३० लाख ८१ हजार ८८८ रुपये किमतीचा १० हजार ८३६.६५ किलो/लिटर संशयित, भेसळयुक्त, चुकीचे लेबल लावलेला तसेच कमी दर्जाचा व असुरक्षित असल्याच्या संशयावरून अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या पाच विभागांत कारवाई करण्यात आली असून, बृहन्मुंबई विभागातील पाच आस्थापनांचे परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसून, मुदतबाह्य, फेरफार केलेले अथवा अस्वच्छ व असुरक्षित परिस्थितीत तयार किंवा साठविलेले अन्नपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis