नांदेड - नृत्य, नाटिका अन् लोकसंस्कृतीच्या रंगांनी रंगली सगरोळीची संध्याकाळ
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। चिमुकल्या पावलांचा ठेका, निरागस चेहऱ्यावरील आत्मविश्वास, तालावर थिरकणारी पावले आणि प्रत्येक सादरीकरणानंतर दुमदुमणारा टाळ्यांचा कडकडाट... अशा उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सवानिमित्त संस्थेच्या बालवाडी व छत्रपती शिवाजी ज
अ


नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। चिमुकल्या पावलांचा ठेका, निरागस चेहऱ्यावरील आत्मविश्वास, तालावर थिरकणारी पावले आणि प्रत्येक सादरीकरणानंतर दुमदुमणारा टाळ्यांचा कडकडाट... अशा उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सवानिमित्त संस्थेच्या बालवाडी व छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने अविस्मरणीय केली. चिमुकल्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.

गणेशावरील भक्तिगीतापासून तेलुगू, पंजाबी, गोविंदा आणि मल्हार गीतांपर्यंत विविधतेने नटलेली सादरीकरणे पाहायला मिळाली. गोंधळ, शौर्यपर सादरीकरणांसोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे विविध रंगही चिमुकल्यांनी आपल्या लयबद्ध नृत्यातून प्रभावीपणे उलगडले. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक हालचाली आणि निरागस भावमुद्रांनी रंगमंचावर जणू महाराष्ट्राची सांस्कृतिक सफरच घडवून आणली.

‘चिमुकले’ म्हणून रंगमंचावर आलेले हे कलाकार आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने मात्र मोठ्यांनाही थक्क करून गेले. एखाद्या गाण्यावर थिरकणारी पावले असोत, समूह नृत्यातील अचूक तालमेळ असो किंवा अभिनयातील निरागस भाव... प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून मनमुराद दाद मिळत होती. टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त कौतुकाने संपूर्ण वातावरणात उत्साह संचारला होता.

मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीवेचा संदेश देणाऱ्या दोन नाटिकांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली. 'सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम' आणि 'विवाह संस्थेसमोरील विविध अडचणी' या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकांनी हसवत-हसवत गंभीर प्रश्न प्रेक्षकांसमोर मांडले. चिमुकल्या कलाकारांच्या अभिनयातून मांडलेले हे विषय उपस्थितांना विचार करायला लावणारे ठरले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने रंगलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात कला, संस्कृती, मनोरंजन आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांना केवळ रंगमंचावर सादरीकरणाची संधी न देता त्यांच्या सुप्त कलागुणांना ओळख, अभिव्यक्तीला व्यासपीठ आणि कौशल्यांना दिशा देण्याचा हा उपक्रम ठरला. चिमुकल्यांच्या या रंगतदार कलाविष्काराने गणेशोत्सवातील आनंदात आणखी एक सुंदर रंग भरला!

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande