
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी पावसातील दीर्घ खंड, अपुरे पर्जन्यमान, जमिनीतील घटलेला ओलावा आणि खालावलेल्या पीकस्थितीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर किनवट-माहूरमध्ये तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी आ. भीमराव केराम यांनी केली. आ. केराम यांनी शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
केवळ कागदोपत्री पर्जन्यमानाची आकडेवारी पाहून दुष्काळाचे मूल्यमापन करू नये, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पीकस्थितीची पाहणी करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्याची परिस्थिती कागदावरील आकडेवारीतून नव्हे, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिसते. पोकळ आश्वासने आणि कागदी अहवाल बाजूला ठेवून जमिनीवरील वास्तव पाहून तातडीने मदत द्यावी, असा मुद्दा आ. केराम यांनी उपस्थित केला. किनवट -माहूर परिसरात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळालेला नाही. पावसातील खंडामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, पीक विम्याचा लाभ, पिण्याचे व शेतीचे पाणी, चारा उपलब्धता तसेच शासनाच्या विविध दुष्काळी सवलती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ बैठकीपुरत्या मर्यादित न ठेवता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावांत आणि शेतशिवारात जाऊन पाहणी करावी. प्रत्यक्ष पंचनामे व वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे मदतीचे नियोजन करावे, असा आग्रहही आ. केराम यांनी धरला. आता पोकळ गोष्टी नकोत; जमिनीवर मदत हवी किनवट माहूरच्या शेतकऱ्यांना सध्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis