कर्जमाफीतील जाचक अटींबाबत आ. तायडेंनी विचारला बँकेला जाब
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे यांनी आसेगावपूर्णा येथील इंडियन बँकेवर कार्यकर्त्यांसह धडक देत बँक व्यवस्थापकांना जाब वि
आसेगावपूर्णातील इंडियन बँकेवर आमदारांची धडक


अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे यांनी आसेगावपूर्णा येथील इंडियन बँकेवर कार्यकर्त्यांसह धडक देत बँक व्यवस्थापकांना जाब विचारला. कर्जमाफी योजनेत पात्र असूनही काही शेतकऱ्यांवर बँकेकडून जाचक अटी लादल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

कर्जाची रक्कम एक लाख रुपयांच्या आत असतानाही ओटीएस (एक वेळ तडजोड) प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या सीबिलवर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच मयत कर्जखातेदारांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने यादीत नाव असूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

आधार प्रमाणीकरण पूर्ण करूनही बँकेच्या दिरंगाईमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पीककर्जामुळे काही शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवर ‘होल्ड’ लावण्यात आल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची बाबही आमदार तायडे यांनी बँक व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित बचत खात्यांवरील होल्ड तातडीने काढण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा तसेच शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या जाचक अटी दूर कराव्यात, अशी मागणी आमदार तायडे यांनी बँक व्यवस्थापकांकडे केली.

जाचक अटी रद्द करण्याचे आदेश

दरम्यान, आमदार प्रवीण तायडे यांच्या मध्यस्थीने बँक व्यवस्थापक राहुल खंडार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर शेतकरी व लाभार्थ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या जाचक अटी तातडीने रद्द करण्याचे आदेश शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले. या निर्णयामुळे संबंधित शेतकरी व लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी भाजपचे कार्यकर्ते नंदू बर्वे, श्याम गावंडे, आशिष मेहत्रे, अक्षय वाटाणे, योगेश भेटाळू, अनिकेत वाठ, प्रशांत धवे, गजानन नांदणे, आकाश प्रजापती आणि छगन बर्वे यांच्यासह परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक वैशाली भोये व सहायक पोलिस निरीक्षक सतीश खेडेकर बंदोबस्तासह उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande