
वर्धा 23 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, आता विसर्जनासाठी वेळ आली आहे. प्रशासनाकडूनही त्याची तयारी पूर्म झाली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल २९९ सार्वजनिक आणि १३ हजार २८ घरगुती अशा एकूण १३ हजार ३२७ गणेशमूर्तींची स्थापना झाली. गणेशोत्सवाच्या विसर्जनाचा प्रारंभ १५ सप्टेंबरपासून झाला. जिल्ह्यात पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. विविध ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घेवून पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन करण्यात आले आहे. दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन १५ सप्टेंबरपासून सुरू झाले. आतापर्यंत सुमारे २९७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी १५४, चौथ्या दिवशी १९२, तर पाचव्या दिवशी ५१८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. १९ सप्टेंबरला १८०, तर २० सप्टेंबरला ३६० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ही संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांचा बंदोबस्त गणेश विसर्जनाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिस विभागाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शहरी तसेच ग्रामीण भागात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
अनंत चतुर्दशीला सर्वाधिक विसर्जन
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबरला सर्वाधिक विसर्जन होणार आहे. या दिवशी जिल्ह्यात १४७ सार्वजनिक आणि सात हजार ४३० घरगुती अशा एकूण सात हजार ५७७ गणेशमूर्तींचे विसर्जन अपेक्षित आहे. ढोल-ताशांच्या गजरात विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वर्धा शहरात नगर परिषदेकडून १२ ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले आहेत. हनुमान टेकडी परिसरात व्ही.जे.एम.कडूनही जलकुंडाची व्यवस्था आहे. धाम नदीवर जलकुंडासह सुकळी येथेही गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे. पवनार येथील धाम नदीकाठावरही प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी