मेळघाटात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मेळघाटच्या गिरगुटी गावात परवानगी व आवश्यक वैद्यकीय पात्रता नसताना शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या शाळेत हे आरोग्यशिबिर स
मेळघाटात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश


अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

मेळघाटच्या गिरगुटी गावात परवानगी व आवश्यक वैद्यकीय पात्रता नसताना शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या शाळेत हे आरोग्यशिबिर सुरू होते. याप्रकरणी आरोग्य विभागाने चिखलदरा पोलिसांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. गिरगुटी येथील एका व्यक्तीकडून बेकायदा पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे आयुर्वेदिक हेल्थकेअरचा परवाना असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या परवान्याच्या आधारे प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार करण्याचा अधिकार असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत परिसरात वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली ८०० ते एक हजार रुपये शुल्क घेत असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करण्यासाठी एका मशीनचा वापर केल्या जात असल्याचेही सांगण्यात आले. या मशीनच्या आधारे रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात असल्याचा आरोप आहे.

आरोग्य विभागाच्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता व अधिकृत नोंदणी नसल्याने त्याच्याकडून वैद्यकीय व्यवसाय केला जात असल्यास ही बाब गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक नायडू, डॉ. लोखंडे, रोहन गीते, सलोनी नायर, गजानन सुने, विनोद चव्हाण, मुकुंद गिरी, रवींद्र बेलसरे, दिलीप चर्जन यांनी ही कारवाई केली.

पोलिस ठाण्यात तक्रार

याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणात आरोग्य विभागाने काही औषधे जप्त केली असून पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande