शेंदोळा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुद्रुक येथे अर्थसंकल्पीय निधीतून सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. बांधकामात अंदाजपत्रकातील निकष व तांत्रिक मार्गदर्शक सूचनांचे पालन
शेंदोळा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..


अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुद्रुक येथे अर्थसंकल्पीय निधीतून सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. बांधकामात अंदाजपत्रकातील निकष व तांत्रिक मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात डस्टचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप शेंदोळा येथील संजय लसणापुरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर करून बांधकामाची तातडीने पाहणी व चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शेंदोळा बुद्रुक येथे अर्थसंकल्पीय निधीतून तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंदाजपत्रकात नमूद केलेल्या गुणवत्तेच्या निकषांनुसार साहित्याचा वापर न करता मोठ्या प्रमाणात डस्टचा वापर करून बांधकाम केले जात असल्याचे लसणापुरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब निदर्शनास येत असतानाही संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे काय, असा सवाल तक्रारदार संजय लसणापुरे यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्यास संबंधित अधिकारी याची दखल का घेत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कामाच्या गुणवत्तेवर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी

शासकीय निधीतून उभारण्यात येणाऱ्या तलाठी कार्यालयाची इमारत दर्जेदार व टिकाऊ असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी करावी, बांधकामाची तांत्रिक गुणवत्ता तपासावी आणि मंजूर अंदाजपत्रकानुसार काम सुरू आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान बांधकामात अनियमितता अथवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास निकृष्ट काम दुरुस्त करूनच पुढील कामास परवानगी द्यावी, अशी मागणीही तक्रारदारांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande