
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)।
अमरावती विद्यापीठात ‘दीक्षारंभ २०२६’ उत्साहात; नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते देशाचे सक्षम व जबाबदार नागरिक बनले, तरच शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले.
विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षारंभ २०२६’ स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा पदवी मिळविणे हा नसून, विद्यार्थ्यांमध्ये चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत लवचिकता आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्याधारित शिक्षण व इंटर्नशिपला प्राधान्य दिले जात असून, त्यातून उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत विकसित भारत २०४७चे स्वप्न साकारण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी ज्ञान व कौशल्ये ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. प्रमुख अतिथी पायल भैसारे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना विभागाची माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व नवीन प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी