
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवानिमित्त संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज व उत्कर्ष बीबीए (एबीएम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी रंगतदार आणि मनोरंजनाची मेजवानी ठरली. तब्बल तीन तास रंगलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
लावणी, गरबा, राधा-कृष्ण नृत्य, बंजारा नृत्य अशा पारंपरिक लोकनृत्यांसोबतच रिमिक्स डान्स, बॉलीवूड नृत्य, तेलुगू नृत्य अशा विविध शैलींचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
घोड्यावरून एंट्री घेत विशेष आकर्षण ठरलेल्या ‘मल्हार महोत्सव’ गीताच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सादरीकरणाची ऊर्जा पाहून प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे बक्षिसांची उधळण करत कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाला आणखी उधाण आले. सर्व परिसर सोनेरी रंगात न्हाऊन निघाला.
अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो, सादरीकरणाची कला विकसित होते आणि विविध कौशल्ये प्रभावीपणे प्रदर्शित करण्याची संधी मिळते. अभ्यासासोबतच कला, संस्कृती आणि अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis