
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या दमट वातावरणाचा परिणाम कीटकजन्य आजारांच्या वाढीवर होत असून, जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे १३६, मलेरियाचे ८६, तर चिकुनगुनियाचे ६३ रुग्ण आढळून आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्या माहितीनुसार, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण व तपासणी, डासांच्या अळ्यांचे निर्मूलन, फॉगिंग तसेच जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ३४, तर चिकुनगुनियाचे १३ रुग्ण होते. मात्र जूनपासून रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. यासोबतच स्क्रब टायफसचाही धोका वाढला आहे. मे महिन्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या १३ झाली. यातील ११ रुग्ण ग्रामीण, तर दोन रुग्ण शहरी भागातील आहेत. नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखून आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी