
सोलापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील पर्यटन क्षमता नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सोलापूर पर्यटन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय, पुणे आणि एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प (ITDP), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी, ग्रामीण, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेष घटक आधारित गावे (TBA) या उपक्रमाशीही पर्यटन सप्ताहाची सांगड घालण्यात आली आहे.
भालेवाडी येथे दूध आणि मिलेट पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार असून, मालदांडी ज्वारी, स्थानिक कृषी पद्धती, पशुपालन आणि ग्रामीण जीवनशैलीची माहिती मिळणार आहे. बोरामणी येथे गवताळ सफारीच्या माध्यमातून गवताळ परिसंस्था, जैवविविधता आणि निसर्ग पर्यटनाचा अनुभव देण्यात येणार आहे.
नान्नज येथील माळढोक अभयारण्यात माळढोकासह विविध पक्षी, गवताळ अधिवास आणि वन्यजीव संवर्धनाची माहिती विद्यार्थ्यांना व पर्यटकांना देण्यात येणार आहे. चिंचणी येथे कृषी, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक संस्कृतीवर आधारित पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेती, ग्रामीण जीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि विविध ग्रामीण उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
या उपक्रमातून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची ओळख व्यापक होण्याबरोबरच स्थानिक कृषी उत्पादने, संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीला पर्यटनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड