
कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ दाखवून राजकीय कामासाठी वापरल्याची तक्रार
अमरावती, २४ सप्टेंबर (हिं.स.) : आगामी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू व कथित आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप शिक्षक नेते चंद्रशेखर भोयर यांनी केला आहे. तसेच संबंधित शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ दाखवून राजकीय कामासाठी वापरले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या निवेदनानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भोयर यांच्या तक्रारीनुसार, संबंधित शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ दाखवून भेटवस्तू पोहोचविण्यासह अन्य राजकीय कामांसाठी त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी असताना त्यांना निवडणूकपूर्व राजकीय कामात सहभागी करून घेणे हा शिक्षण व्यवस्थेचा गैरवापर असल्याचे भोयर यांनी म्हटले आहे.
भेटवस्तू व प्रलोभन दिल्याचा दावा
आगामी २०२६ च्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या भेटवस्तू अथवा प्रलोभने दिली जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा भोयर यांनी तक्रारीत केला आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, काही शाळांमध्ये पैठणी तसेच रोख रकमेचे वाटप केले जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. शिवकृपा हायस्कूलमधील काही शिक्षकांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैठणी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येत असल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे. संबंधितांकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यास तेही महत्त्वाचे ठरणार आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी