
पीक कापणी प्रयोगानंतर नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार
कपाशीच्या उत्पादनातही घट होण्याचा अंदाज
वर्धा, २४ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था दयनीय झाली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक कापणीच्या टप्प्यात आले असून अनेक भागांत शेंगा भरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात येणार असून, या प्रयोगानंतरच पिकांचे नेमके नुकसान किती झाले, याचा अंदाज स्पष्ट होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
अनियमित पावसामुळे अनेक भागांतील पिके करपली आहेत. काही भागांत झालेल्या पावसामुळे पिके हिरवी दिसत असली, तरी कृषी विभागाच्या सर्वेक्षणात सोयाबीनला फुलधारणा कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेंगा भरण्याचे प्रमाणही कमी असल्याने विविध महसूल मंडळांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात साधारण १५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.ज्या भागांत पावसाचा मोठा खंड पडला, तेथे सोयाबीनची पिके पिवळी पडली असून काही ठिकाणी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सोयाबीनच्या उत्पादनातील प्रत्यक्ष घट पीक कापणी प्रयोगानंतरच स्पष्ट होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
कपाशीवरही पावसाचा परिणाम
कपाशीची स्थितीही चिंताजनक आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सध्या कपाशीची रोपे साधारण दोन ते साडेतीन फुटांपर्यंत वाढली असून पीक बोंडधारणेच्या अवस्थेत आहे. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने कपाशीची वाढ खुंटल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, सर्वेक्षणाच्या आधारे कपाशीच्या उत्पादनात १० ते २५ क्विंटलपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२० महसूल मंडळांत सर्वेक्षण
जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी २० महसूल मंडळांमध्ये तसेच तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात पिकांची अवस्था, पाण्याची गरज असलेली संवेदनशील पीक अवस्था तसेच किडींच्या प्रादुर्भावाची पाहणी करण्यात आली.या पाहणीच्या आधारे जिल्ह्यातील अपेक्षित नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला आहे. मात्र, सोयाबीनसह अन्य पिकांचे प्रत्यक्ष नुकसान आणि उत्पादनातील घट याचे अधिक अचूक चित्र पीक कापणी प्रयोगानंतर स्पष्ट होणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी