
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाचा खंड, असंतुलित पर्जन्यमान व वाढलेले तापमान, याचा एकूणच परिणाम जलसाठा आणि जलपातळीत घट होण्यात होऊ लागला आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची सरासरी कमी आहे. उपलब्ध जलस्रोतांतून उपसा वाढल्याने जिल्ह्यातील तीन तालुके अतिशोषित व दोन तालुके चिंताजनक श्रेणीत आल्याची धक्कादायक स्थिती आहे.
तालुक्यांची पाणीपातळीच्या सुरक्षिततेनुसार अतिशोषित, चिंताजनक व संरक्षित तालुके, अशी विभागणी करण्यात आली आहे. अतिशोषित तालुक्यांच्या श्रेणीत भूजलाचा उपसा अधिक असलेले चांदूरबाजार, दर्यापूर व वरुड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, मोर्शी व अचलपूर हे चिंताजनक तालुक्यांच्या श्रेणीत असून उर्वरित तालुक्यांचा समावेश सुरक्षित तालुक्यांमध्ये करण्यात आला आहे. तथापि पाणीसाठ्याची विद्यमान स्थिती व जलपातळीतील घट बघता पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्याची वेळ सध्या आली आहे. भूजल पातळी थेट धरणांमधील पाणीसाठ्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रकल्पांवरील भार आगामी काळात चांगलाच वाढणार आहे. ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला इशारा व अंदाज बऱ्यापैकी खरा उतरत असल्याने आगामी काळात पावसाची शक्यता कमी आहे. परतीच्या पावसावर धरणांतील जलसाठ्यासह भूगर्भातील पातळी वाढण्याचा अंदाज असला तरी यंदा मात्र त्यावर भिस्त ठेवता येणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
५९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा
सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या ५९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. अप्पर वर्धा या मुख्य धरणातील पाणीपातळी घटली असून तिथे सध्या नियंत्रित जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांत ५८ टक्के व ४८ लघुप्रकल्पांत ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण सर्व सिंचन प्रकल्पांत ६१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो २४ टक्के कमी आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी