
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवामुळे शहरात नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. श्रीफळ म्हणून पूजेत नारळाला विशेष महत्त्व असल्याने गणपतीसमोरील कलशात नारळ ठेवण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर घरोघरी, मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन होत असल्याने नारळाच्या विक्रीला चांगलीच चालना मिळाली आहे. या बारा दिवसांच्या उत्सवकाळात शहरातील नारळविक्रीचा आकडा सुमारे सहा लाखांवर जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चातुर्मास सुरू झाल्यानंतर विविध सण-उत्सवांमुळे नारळाची मागणी वाढत जाते. श्रावणातही मोठ्या प्रमाणात नारळाची विक्री झाली होती. आता गणेशोत्सवामुळे मागणीत आणखी वाढ झाली आहे. पितृपक्षाचा कालावधी वगळता नवरात्रोत्सव आणि दिवाळीपर्यंत नारळाची विक्री वाढती राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.अमरावती शहरात तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांतून नारळाची आवक होते. सध्या घाऊक बाजारात मध्यम ते मोठ्या आकाराचा नारळ २५ ते ३५ रुपये प्रतिनग दराने उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात मात्र एका नारळासाठी ४० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, शहरातील नारळ व्यापाऱ्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत घटली आहे. सध्या अमरावती शहरात केवळ दहा ते बारा व्यापारी नारळाच्या व्यवसायात आहेत. काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात दररोज २० ते २५ ट्रक नारळांची आवक होत होती. आता ही आवक घटून पाच ते आठ ट्रकवर आली आहे.पूर्वी अमरावती शहरातून जिल्ह्यातील विविध भागांत नारळाचा पुरवठा केला जात होता. मात्र, सध्या अनेक व्यापारी थेट दक्षिणेकडील राज्यांतून नारळाची खरेदी करीत असल्याने शहरातील आवक घटली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मागणी वाढत असली तरी स्थानिक बाजारातील आवक पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी