वरूड-मोर्शीतील दुष्काळी परिस्थितीचा सुनेत्रा पवारांनी घेतला आढावा
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा
वरूड-मोर्शीतील दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा


अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. आज मुंबई येथे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व नागरिकांच्या समस्या तसेच पाणीटंचाईबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आढावा घेतला.

कोरड्या दुष्काळामुळेवरूड-मोर्शी भागातील पाण्याची पातळी खालावली असून जमिनीतील ओलावा कमी झाल्याने संत्रा व मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तसेच कापूस व सोयाबीन पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना दिल्या.तसेच वरूड-मोर्शी तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे तात्काळ बंद करून पिण्याचे पाणी, सिंचन आणि पशुधनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करून ठेवावा, असे निर्देशही दिले.लोकनेते स्वर्गीय अजित पवारांनी मंजूर केलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

तसेच मोर्शी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. याशिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक व पशुधनाला भेडसावणाऱ्या अडचणींचा प्रशासनाने नियमितपणे आढावा घ्यावा आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. शेतकरी आणि नागरिकांना पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करावे, तसेच परिस्थितीची सातत्याने माहिती शासनाला सादर करावी, असेही स्पष्ट केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande