
५७ हजार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याचे आदेश आतापर्यंत केवळ ३,३७२ खातेदारांना वाटप
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ५६ हजार ९०५ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, शासनाने संबंधित बँकांकडे ५२१.४९ कोटी रुपये वर्ग केले आहेत. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना २०२६ च्या खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज देणे बँकांना बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात केवळ ३,३७२ खातेदारांनाच कर्जवाटप झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिकच गंभीर झाले आहे.
राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कर्जमाफीचा लाभ घेऊन कर्जमुक्त झालेल्या खातेदारांना नव्याने पीककर्ज देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. सहकार आयुक्त व निबंधकांनीही बँकांना सूचना दिल्या आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा उपनिबंधक राजेश भूयार यांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या १८,२३६ कर्जमाफी झालेल्या खातेदारांपैकी केवळ १८९, बँक ऑफ महाराष्ट्रच्या १३,१६१ पैकी ८९४, तर सेंट्रल बँकेच्या ११,१०२ पैकी १,३२१ खातेदारांना पीककर्ज मिळाले आहे.
दरम्यान, कर्जमाफीतील ई-केवायसी प्रलंबित खातेदारांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची व्हीसी घेऊन पात्र खातेदारांचे ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी व सहकार विभागाचे कर्मचारी खातेदारांच्या भेटी घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. मृत खातेदारांच्या वारसांनाही याबाबत माहिती दिली जाणार आहे.
कर्जमाफीची स्थिती :
पोर्टलवर अपलोड खाती - १,२४,१४२ पात्र शेतकरी - ८६,४४७ ई-केवायसी पूर्ण - ६७,८२४ ई-केवायसी बाकी - १८,६१५ निधी प्राप्त खाती - ५६,९०५
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी