शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ‘रासरंग’ गरबा रद्द
डोंबिवली, 24 सप्टेंबर (हिं.स.)। - उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा मित्
Ph01


डोंबिवली, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

- उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य रासरंग दांडिया-गरबा महोत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी होणारा खर्च वाचवून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेने तर्फे देण्यात आली.

गुरुवारी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा येथे या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, संतोष चव्हाण, सतीश मोडक, शरद गंभीरराव, विवेक खामकर, प्रकाश म्हात्रे, सागर जेधे, केतकी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या गरबा महोत्सवात देशभरातील तसेच महाराष्ट्रातील कलाकार सहभागी होत असतात. मात्र सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन यंदा मनोरंजनाचा भव्य कार्यक्रम न घेता नवरात्रोत्सव धार्मिक पद्धतीने साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यांसह विविध पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करणे योग्य ठरणार नाही. गरबा-दांडियासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या काळात यंदा धार्मिक विधींवर भर देण्यात येणार असून देवीची आराधना करताना महाराष्ट्रातील शेतकरी सुखी राहावा, राज्यात चांगला पाऊस पडावा आणि राज्य सुजलाम्-सुफलाम् व्हावे अशी प्रार्थना केली जाणार आहे. विविध धार्मिक विधी आणि होमहवनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनीही शेतकरी संकटात असताना सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्चाला विराम देऊन सामाजिक जबाबदारी जपण्याची भूमिका मांडली. यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातून पूरग्रस्त भागात मदत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande