
जालना, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये असे आदेश आयुक्त, जालना शहर महानगरपालिका यांनी दिले आहे
मनाई असतानाही घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
जालना शहर व परिसरातील नागरिकांना जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की, प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री. गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशय हा जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख जलस्रोत असून, सदर जलाशयातील पाण्याचा उपयोग शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे जलाशयातील पाण्याचे प्रदूषण होऊ नये व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई आहे.
तथापि, काही नागरिकांकडून मनाई असतानाही घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने जलस्रोतांचे संवर्धन व उपलब्ध पाण्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जालना शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करावा.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis