
जालना, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
जालना विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आज मतदारसंघातील विविध भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी खरीप पिकांची झालेली दयनीय अवस्था यावेळी त्यांनी जवळून पाहिली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून काही पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही धोक्यात आला असून, पावसाअभावी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.
यापूर्वीही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर हे थेट शेतातून सहभागी झाले होते. मंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत त्यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनासमोर मांडली.
“शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक गेले; थेट दुष्काळ जाहीर करा” यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले. कृषिमंत्री भरणे मामा यांच्याशी संवाद साधताना त्यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले.
“शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक गेले आहे. गेल्या ४० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे उभे पीक वाया गेले आहे. आता कापणी करून काय करणार? परिस्थिती इतकी गंभीर आहे की थेट दुष्काळ जाहीर करा,” अशी मागणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली.
शेताच्या बांधावर उभे राहून पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवत असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी
पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच आवश्यक त्या सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे उभे पीक वाया जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे,” अशी भूमिका आमदार खोतकर यांनी मांडली.
जालना विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी शासनस्तरावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात आणि दुष्काळी परिस्थितीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, सुधाकर वाडेकर, गणेश मोहिते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis