
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
प्रतियुतीमुळे रात्रभर आकाशात, साध्या डोळ्यांनी दर्शन अशक्य
सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून २६ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या तुलनेने जवळ येणार आहे. या दिवशी नेपच्यून सूर्याच्या विरुद्ध दिशेला येणार असल्याने खगोलशास्त्रीय भाषेत ही स्थिती 'प्रतियुती' म्हणून ओळखली जाते. प्रतियुतीच्या काळात पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर तुलनेने कमी होते. त्यामुळे शक्तिशाली दुर्बिणीतून नेपच्यूनचे निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तब्बल १६५ वर्षे लागतात, तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. १३ सप्टेंबर १८४६ रोजी जर्मन खगोलशास्त्रज्ञ योहान गॅले यांनी या ग्रहाचा शोध लावला. नेपच्यूनला १३ ज्ञात चंद्र आहेत. वातावरणात असलेल्या मिथेन वायूमुळे हा ग्रह निळसर रंगाचा दिसतो.नेपच्यूनचा व्यास सुमारे ४८ हजार ६०० किलोमीटर असून, त्याच्या वातावरणातील तापमान सुमारे उणे २१४ अंश सेल्सिअसपर्यंत असते. २४ ऑगस्ट १९८९ रोजी 'व्हॉयेजर-२' हे मानवरहित अंतराळयान नेपच्यूनजवळून गेले होते. सूर्यापासून नेपच्यूनचे सरासरी अंतर सुमारे ४५२ कोटी किलोमीटर म्हणजेच ३०.१ खगोलीय एकक आहे.२६ सप्टेंबर रोजी नेपच्यून सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिम क्षितिजाकडे मावळेल. त्यामुळे तो रात्रभर आकाशात राहणार आहे. मात्र, त्याची चमक अत्यंत कमी असल्याने नेपच्यून साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. त्यासाठी शक्तिशाली दुर्बिणीची आवश्यकता असेल. दुर्बिणीतून निरीक्षण केल्यास तो फिकट निळसर रंगाचा दिसू शकतो.या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. यापूर्वी २३ सप्टेंबर २०२५ रोजी नेपच्यून प्रतियुतीच्या स्थितीत आला होता, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी