
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
स्वतः मोबाईल चालवून पाहतो आवडीचे व्हिडिओ,चोच आणि पंजांच्या मदतीने मोबाईलची स्क्रीन करतो स्क्रोल
अंजनगाव सुर्जी शहरातील मोगरे परिवाराचा एक पोपट सध्या सोशल मीडियावर चर्वेचा विषय ठरला आहे. हा पोपट चक्क स्वतः मोबाईल हाताळत यूट्यूबवर आपले आवडते व्हिडिओ पाहताना दिसत आहे. त्याच्या या अनोख्या 'कौशल्याचा' व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये पोपट चोच आणि पंजांच्या मदतीने मोबाईल फोनची स्क्रीन स्क्रोल करताना दिसतो. स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय उघडल्यानंतर तो यूट्यूब अॅप सुरू करतो. विशेष म्हणजे, यूट्यूब सुरू झाल्यानंतर पोपट चोचीने स्क्रीनवर स्पर्श करत विविध व्हिडिओ निवडण्याचा प्रयत्न करतो.
या व्हिडिओमधील सर्वात लक्षवेधी क्षण म्हणजे स्क्रीनवर दुसन्या पोपटाचा व्हिडिओ दिसताच हा पोपट तात्काळ त्या व्हिडिओवर क्लिक करतो. त्यानंतर तो स्क्रीनकडे लक्षपूर्वक पाहत व्हिडिओ पाहताना दिसतो.या अनोख्या कृतीमुळे सोशल मीडियावर पोपटाला 'यूट्यूब एक्सपर्ट' अशी गंमतीदार उपमा दिली जात आहे. काही नेटकरी त्याच्या मोबाईल हाताळण्याच्या 'क्षमतेचे कौतुक करत आहेत, तर काहींनी हा पोपट मोबाईल किंवा यूट्यूब वापरण्याचे प्रशिक्षण घेतले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार मोगरे परिवाराने या पोपटाला मोबाईल किंवा यूट्यूब चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झालेले नाही. अंजनगाव सुर्जीतील मोगरे परिवाराचा हा 'स्मार्ट पोपट' मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाब चर्चेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी