
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत’ या संकल्पनेतून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-दोन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांसह सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था व विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी केले.
या अभियानाची सुरवात १७ सप्टेंबरपासून करण्यात आली. त्यानिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या हस्ते होर्डिंग्जचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले, सुनील इंगोले, प्रशांत सातव, बाळासाहेब बोर्डे, धनंजय तीरमारे, दिनेश गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानात अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, बाजारपेठा, बसस्थानके व सार्वजनिक परिसराची साफसफाई, सफाईमित्रांची आरोग्यतपासणी, शून्य कचरा उत्सव, प्रभातफेरी, जनजागृती व विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
याबाबत अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले म्हणाले की, आगामी 1 ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस एक तास एक साथ’ या संकल्पनेतून जिल्हाभर सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी