
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
दुचाकीस्वार गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर वनविभागाकडून परिसरात शोधमोहीम..
तिवसा तालुक्यात बिबट्याच्या वावराबाबत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच, मोझरी बायपास मार्गावर दुचाकीस्वारावर बिबट्याने झडप मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने जात असताना मोझरी बायपास परिसरात अचानक बिबट्याने झडप मारल्याने दुचाकीचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने परिसराची पाहणी करून बिबट्याचा माग काढण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.दरम्यान, मोझरी बायपासलगत असलेल्या सागाच्या जंगलातून बिबट्या रस्ता ओलांडून मोझरी व गुरुदेव नगरच्या दिशेने गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या बाबत अद्याप वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच दुचाकीस्वाराचा अपघात नेमका बिबट्याच्या हल्ल्यामुळेच झाला का, याबाबतही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.या घटनेमुळे मोझरी, गुरुदेव नगर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे पथक परिसरात पाहणी व शोधमोहीम राबवत असून, बिबट्याच्या उपस्थितीबाबत अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, रात्रीच्या वेळी एकट्याने गावाबाहेर किंवा शेतशिवारात जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी