अनुदान लाटण्यासाठी सातबाऱ्यावर खोडतोड
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार, कार्यवाहीकडे शेतकऱ्यांचे लक्ष अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अचलपूर बाजार समितीतील एका पदाधिकाऱ्याने सीसीआयचे अनुदान लाटण्यासाठी सातबाऱ्यावर खोडताड करून वर्षभरात वेगवेगळे पीकपेरे दाखवून अनुदान लाटले. याब
अनुदान लाटण्यासाठी सातबाऱ्यावर खोडतोड


अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार, कार्यवाहीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अचलपूर बाजार समितीतील एका पदाधिकाऱ्याने सीसीआयचे अनुदान लाटण्यासाठी सातबाऱ्यावर खोडताड करून वर्षभरात वेगवेगळे पीकपेरे दाखवून अनुदान लाटले. याबाबतची तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाईल डिजिटल युगात प्रचंड क्रांती झालेली असताना शासकीय अनेक योजना दिवस उजाडल्यापासून रात्रीपर्यंत दैनंदिन घडामोडींमध्ये ऑनलाइन प्रणालीचा वापर अत्यंत अनिवार्य झालेला आहे. अशावेळी त्याचे अनेक फायदे असताना त्याचा गैरवापर करून फसवण्याचे प्रकार दुप्पटीने समोर येत आहेत. बँकिंगसारख्या आर्थिक व्यवहारात फसवणुकीचे प्रमाण अधिक होत असताना आता तो प्रकार शेतकऱ्यांच्या परिश्रमाच्या मुळावर सुद्धा उठलेला दिसून येत आहे.

सदर प्रकरणातील तक्रारीमध्ये पथ्रोट येथील शेतकऱ्याची १.२९ हेक्टर आर शेती असून सदर क्षेत्रफळाचा सातबारा त्यांच्या नावे ऑनलाइन आहे. मूळ पेरेपत्रकावर २०२०-२१ पर्यंत कापूस पेरा नमूद असताना मात्र त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी २०२५-२६ पर्यंत या सातबाऱ्यावर कुठल्याच पिकाचा पेरा नोंद नाही. असे असताना त्या पदाधिकाऱ्याने (शेतकरी) ऑनलाइन नोंदणीसाठी सादर केलेल्या याच डिजिटल सातबाऱ्यावर खोडतोड करून २०२५-२६ मध्ये सातबाऱ्याच्या १.२९ हेक्टर आर क्षेत्रफळावर खरीप पीक म्हणून कापूस तर रब्बी पीक म्हणून हरभरा पिकांची बोगस नोंद केली.

अशाप्रकारे या बोगस सातबाऱ्याचा वापर करून शासकीय हमीभाव धान्य खरेदी अंतर्गत अचलपूर बाजार समितीमध्ये सीसीआयला कापूस विकण्यासाठी केला गेला आणि शासकीय हमीभावावर शासनाला तूरसुद्धा विकण्यात आल्याचा प्रकार तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्या पदाधिकाऱ्याने एकाच तारखेला एकापेक्षा जास्त डिजिटल सातबारे काही मिनिटांच्या फरकाने पोर्टलवरून काढले व तेवढ्याच अवधित परिपत्रकावरील धान्याचे पेरेसुद्धा बदलल्या गेल्याचाही उल्लेख सदर तक्रारीत करण्यात आला आहे. आता याप्रकरणात कशाप्रकारची कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात अचलपूर बाजार समितीचे प्रभारी सचिव मंगेश भेटाळू म्हणाले की, डिजिटल सातबाऱ्यावर खोडतोड करून बाजार समितीच्या शासकीय हमीभाव केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. सध्या तरी सदर तक्रार अर्जावर निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande