
वर्धा, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत शैक्षणिक सत्र २०२७-२८ पासून विद्यापीठाच्या वर्धा मुख्यालयात 'स्त्री अध्ययन' आणि 'सिनेमा अध्ययन' विभागांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा व याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे महत्त्वपूर्ण निर्णय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कार्यपरिषदेच्या (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) बैठकीत, घेण्यात आले. ही बैठक कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ परिसरात 'हायब्रिड' (प्रत्यक्ष व ऑनलाइन) पद्धतीने पार पडली.
बैठकीत विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. २०२२-२३ या सत्रातील पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता नव्या सत्रापासून ही प्रवेश प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने विद्यापीठातील प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) व डिप्लोमा अभ्यासक्रम अविरत सुरू राहतील. या धोरणानुसार एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, तर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना डिप्लोमा प्रदान केला जाईल.
विद्यापीठात संशोधनाला अधिक चालना देण्यासाठी 'पंडित दीनदयाल उपाध्याय संशोधन पीठ' स्थापन करण्यास कार्यपरिषदेने तत्त्वतः मंजुरी दिली. यासोबतच नव्या विभागप्रमुखांच्या आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्यांसह 'करिअर प्रगती योजने' अंतर्गत (सीएएस) झालेल्या पदोन्नतींनाही कार्यपरिषदेने अधिकृत मान्यता प्रदान केली. या बैठकीस कार्यपरिषदेचे बाह्य सदस्य प्रो. सुरेंद्र दुबे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर इतर बाह्य सदस्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी